डेस्क | सोंदरी (ब्रह्मपुरी)
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडीतील चिमुकल्यांना पोषण आहार शिजवून देणाऱ्या महिला बचत गटांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये गेल्या 14 ते 15 महिन्यांपासून खिचडी शिजवून देणाऱ्या महिलांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही. यामुळे हा पोषण आहार आता पूर्णपणे उधारी आणि उसनवारीवर अवलंबून असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
उधारीवर चालतोय चिमुकल्यांचा आहार
0 ते 6 वयोगटातील मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि कुपोषण निर्मूलन व्हावे, या उद्देशाने शासन अंगणवाडीत पोषण आहार पुरवते. हा आहार शिजवण्याची जबाबदारी स्थानिक महिला बचत गटांना देण्यात आली आहे. मात्र, वर्षभरापेक्षा जास्त काळ लोटूनही शासनाकडून मानधन मिळाले नसल्याने या महिलांसमोर प्रपंच कसा चालवावा, असा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. आहार शिजवण्यासाठी लागणारे साहित्य, इंधन आणि इतर वस्तू या महिलांना किराणा दुकानातून उधारीवर किंवा इतरांकडून पैसे उसने घेऊन घ्याव्या लागत आहेत.
प्रशासनाकडून केवळ आश्वासन?
आपल्या हक्काचा मोबदला केव्हा मिळणार, हे विचारण्यासाठी बचत गटाच्या महिला वारंवार एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत. परंतु, तिथून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांच्या पदरी केवळ निराशाच पडत आहे.
तात्काळ देयके देण्याची मागणी
एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. पोषण आहार शिजवून देणाऱ्या या महिलांचा थकीत मोबदला त्वरित अदा करावा, जेणेकरून त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडता येईल, अशी विनंती बचत गटाच्या महिलांनी केली आहे.
