DESK | नाशिक
नाशिकमधील इंदिरा नगर परिसरातून एक अत्यंत चटका लावून जाणारी घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय विशेष (Special Child) तरुणाने राहत्या घरी अंघोळीचा साबण खाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अथर्व द्विवेदी असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हा ‘स्पेशल चाइल्ड’ होता. बुधवारी (29 एप्रिल) त्याने घरात कोणाचेही लक्ष नसताना अंघोळीचा साबण खाल्ला. साबण खाल्यानंतर काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याची प्रकृती वेगाने बिघडली. त्याच्या घरातील सदस्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने धावपळ करत त्याला उपचारासाठी जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
मृत्यूचे कारण काय असू शकते?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, साबणामध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम हायड्रॉक्साईड आणि इतर रसायने असतात. साबण खाल्ल्यानंतर तोंडात आणि घशात मोठ्या प्रमाणात फेस तयार होतो. हा फेस श्वासनलिकेत अडकल्याने श्वास गुदमरण्याची शक्यता असते (Choking). तसेच, साबणातील रसायनांमुळे शरीराच्या अंतर्गत भागाला इजा पोहोचून ‘केमिकल पॉयझनिंग’ देखील होऊ शकते.
पोलीस तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. नाशिकच्या इंदिरा नगर पोलीस ठाण्यात सध्या ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. अथर्वचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्याचा सविस्तर अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
तज्ज्ञांचा सल्ला: विशेष काळजी घेणे गरजेचे
अशा घटना टाळण्यासाठी घरातील रसायने, साबण, फिनाईल किंवा औषधे ही मुलांच्या आणि विशेष व्यक्तींच्या हाताला लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. विशेष मुलांच्या बाबतीत सतत देखरेख असणे आवश्यक असते, कारण त्यांना वस्तूंच्या परिणामांची जाणीव नसते.
