Top 5 This Week

Related Posts

BREAKING

AMRAVATI : तरुणावर चाकूने वार; नंदनवनमध्ये खळबळ

Desk | Amravati

शहरात प्रवासादरम्यान महिलांच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला जाण्याच्या दोन स्वतंत्र घटना समोर आल्या आहेत. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोन महिलांना लक्ष्य केले. या दोन्ही घटनांमध्ये तब्बल 66.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 6 हजार 500 रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी सिटी कोतवाली आणि खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. पहिली घटना : 72 वर्षीय महिलेची पर्स लंपास पहिल्या घटनेत नमुना गल्ली परिसरातील रहिवासी उषा (वय 72) या बुधवारी दुपारी सुमारे 1.30 वाजताच्या सुमारास अमरावती बसस्थानकावरून नागपूरला जाणाऱ्या बसमध्ये बसल्या होत्या. प्रवासादरम्यान बस पंचवटी परिसरात पोहोचल्यानंतर वाहकाला तिकिटाचे पैसे देण्यासाठी त्यांनी आपली बॅग उघडली. याच दरम्यान त्यांच्या बॅगेतील गुलाबी रंगाच्या पर्सकडे चोरट्यांचे लक्ष गेले. अज्ञात चोरट्याने संधी साधून पर्स लंपास केली. काही वेळानंतर पर्स चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पर्समध्ये सुमारे 40 ग्रॅम वजनाचा सोन्याचा चिक हार आणि 6 हजार 500 रुपये रोख रक्कम होती. या घटनेमुळे ज्येष्ठ महिलेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यांनी या चोरीची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना : 26.5 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला चोरीची दुसरी घटना अकोली येथील जुनी म्हाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या वैष्णवी (वय 26) यांच्यासोबत घडली. वैष्णवी या 20 नोव्हेंबर रोजी रात्री कुटुंबीयांसह चांदूर रेल्वे येथे गेल्या होत्या. तेथे दोन दिवस मुक्काम केल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी सकाळी त्या खासगी बसने अमरावतीकडे परत निघाल्या. अमरावतीत पोहोचल्यानंतर त्यांनी ऑटोने साईनगर मार्गे म्हाडा कॉलनीतील आपले घर गाठले. मात्र, प्रवासादरम्यान सोबत असलेल्या पर्सची त्यांनी तत्काळ तपासणी केली नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी सकाळी पर्स तपासली असता त्यातील 26.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रवासादरम्यानच अज्ञात चोरट्यांनी दागिने चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणीही संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्रवाशांनी सावध राहण्याचे आवाहन दरम्यान, बसस्थानक, गर्दीच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक आणि खासगी वाहनांमधून प्रवास करताना महिलांच्या पर्समधील मौल्यवान वस्तूंना चोरटे लक्ष्य करीत असल्याचे या घटनांमधून दिसून येत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी अनोळखी व्यक्तींकडून होणाऱ्या हालचालींकडे प्रवाशांनी लक्ष देणे आवश्यक आहे. सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठेवाव्यात. प्रवासादरम्यान पर्स नेहमी स्वतःच्या देखरेखीखाली ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. अमरावती शहरातील या दोन्ही चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.