Top 5 This Week

Related Posts

BREAKING

MAHARASHTRA : जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे; वडेट्टीवार आक्रमक

Desk | Maharashtra

बहुजन-ओबीसी समाजाच्या संविधानिक हक्कांसाठी सुरू करण्यात आलेल्या मंडल यात्रा 2026चा चंद्रपुरात दिमाखदार समारोप झाला. या समारोपीय कार्यक्रमाला ओबीसी समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारो नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणना, युवकांचा रोजगार, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर सरकारवर जोरदार निशाणा साधला. विजय वडेट्टीवार म्हणाले की, “आज तरुणांच्या हाताला रोजगार नाही, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुरेशा संधी उपलब्ध नाहीत, शेतकरी आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीत बहुजन आणि ओबीसी समाजाच्या संविधानिक हक्कांवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.” जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाय करण्याऐवजी धर्म आणि भावनेच्या राजकारणातून बहुजन समाजाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. “धर्म हा श्रद्धेचा विषय आहे; मात्र जनतेच्या हक्कांचा प्रश्न हा जगण्याचा प्रश्न आहे,” असे सांगत वडेट्टीवार यांनी रोजगार, शिक्षण, शेती आणि आरक्षण या मुद्द्यांना प्राधान्य देण्याची मागणी केली. मंडल आयोगाच्या माध्यमातून मिळालेले आरक्षण हे कोणाच्या कृपेने मिळालेले नसून संघर्षातून प्राप्त झालेले संविधानिक अधिकार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी समाजाने एकजूट होण्याचे आवाहन करत वडेट्टीवार म्हणाले, “ओबीसींचे हक्क हिरावून घेण्याचा कोणताही प्रयत्न झाला, तर आम्ही गप्प बसणार नाही. हा लढा केवळ एका समाजाचा नसून सामाजिक न्यायाचा आणि संविधानिक अधिकारांचा लढा आहे.” जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरही त्यांनी ठाम भूमिका मांडली. ओबीसी समाजाची वास्तविक लोकसंख्या समोर आली पाहिजे आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण, रोजगार, राजकीय प्रतिनिधित्व आणि विकासामध्ये न्याय्य वाटा मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

“जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. ओबीसींची खरी लोकसंख्या समोर आलीच पाहिजे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी हा संघर्ष आता अधिक तीव्र करावा लागेल,” असे वडेट्टीवार यांनी सांगितले. मंडल यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यात आली. चंद्रपुरातील समारोप कार्यक्रमाने या आंदोलनाला नवी दिशा आणि ऊर्जा मिळाल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. या कार्यक्रमाला पदवीधर शिक्षक आमदार अभिजित वंजारी, प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे, मंडल यात्रा संयोजक उमेश कोराम, काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर, विनायक बांगडे, अनिल डहाके, ॲड. विलास माथनकर, विजय टोंगे, उपमहापौर प्रशांत दानव, नंदू नगरकर, ॲड. सातपुते, बाळाभाऊ खोब्रागडे, दीप्ती सोनटक्के, प्रवीण पडवेकर यांच्यासह मंडल यात्रेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.चंद्रपुरातील या दिमाखदार समारोपातून ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, जातनिहाय जनगणना आणि सामाजिक न्यायासाठीचा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.