Top 5 This Week

Related Posts

BREAKING

MAHARASHTRA : शेतकरी हितासाठी वडेट्टीवार आक्रमक; सरकारला घेरले..

Desk | Maharashtra

विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका करत लोकशाही, शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततामय आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत त्यांनी सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याची टीका केली. तसेच नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील सुपीक शेतीजमिनी उद्योगांसाठी संपादित करण्याच्या निर्णयालाही त्यांनी तीव्र विरोध दर्शविला. याशिवाय मुंबई आणि पुण्यातील कथित FSI, TDR आणि SRA घोटाळ्यांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले की, दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज हा लोकशाही मूल्यांवर आघात आहे. आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कारवाईमुळे देशभरातील तरुणांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून सरकारने संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा उल्लेख करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे सांगितले. “लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततामय आंदोलन करण्याचा अधिकार आहे. सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याऐवजी लाठीचार्ज करून चुकीचा संदेश दिला,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात सुमारे तीन हजार एकर सुपीक जमीन उद्योगासाठी संपादित करण्याच्या प्रस्तावावरही प्रश्न उपस्थित केले. उद्योग उभारण्यास काँग्रेसचा विरोध नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सुपीक शेतीजमीन घेण्याऐवजी पडीत किंवा पर्यायी जमीन वापरण्याचा आग्रह धरला. उद्योग भविष्यात बंद पडू शकतात, मात्र शेतकऱ्यांची जमीन कायमची निघून जाते, त्यामुळे अशा निर्णयांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारे सुपीक जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, सरकार उद्योगपतींना प्राधान्य देत असून शेतकऱ्यांच्या भावना दुर्लक्षित करत आहे. “जबरदस्तीने जमीन संपादन करण्याचा प्रयत्न झाला तर काँग्रेस प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.  तकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन घेऊ देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

याचबरोबर त्यांनी मुंबईतील कथित FSI घोटाळा, पुण्यातील TDR घोटाळा आणि SRA प्रकल्पांमधील गैरव्यवहारांवरही गंभीर आरोप केले. संबंधित घोटाळ्यांमुळे सरकारी महसुलाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. अनेक वेळा विधानसभेत हे मुद्दे उपस्थित करूनही सरकारने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.SRA विभागातील काही अधिकारी आणि संबंधित यंत्रणांमध्ये मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. “इतके मोठे घोटाळे समोर येत असताना सरकारने गप्प बसणे योग्य नाही. सत्य बाहेर आणून दोषींना शिक्षा झाली पाहिजे,” असे ते म्हणाले. शेवटी दिल्लीतील आंदोलनावरील कारवाईचा निषेध पुन्हा नोंदवत वडेट्टीवार यांनी सरकारने लोकशाही मूल्यांचा आदर करून जनतेच्या प्रश्नांवर संवाद साधावा, अशी मागणी केली. अन्यथा तरुणांचा रोष आणखी तीव्र होईल आणि त्याचे राजकीय परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.