Desk | Maharashtra
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना वगळण्याचा निर्णय, शेतकरी कर्जमाफीवरील अटी, विदर्भातील पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती तसेच एसआरए आणि टीडीआर घोटाळ्यांवर गंभीर आरोप केले. सरकारकडे आता आर्थिक क्षमता उरलेली नसल्याने विविध योजनांमध्ये कठोर अटी लावून लाभार्थ्यांना वगळले जात असल्याचा दावा त्यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकांच्या काळात सरकारने कोणत्याही कठोर अटी न लावता लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून जवळपास ९२ लाख महिलांना विविध निकषांच्या आधारे लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. निवडणुका संपल्यानंतर सरकारने महिलांशी अन्याय करण्याचा मार्ग स्वीकारला असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातही सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, आयकर विभागाच्या माहितीच्या आधारे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक शेतकरी केवळ शेतीसंबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे भरतात. त्यामुळे त्यांना प्रत्यक्षात मोठे उत्पन्न नसतानाही आयकरदाते म्हणून गृहित धरले जात आहे. कंत्राटी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील आणि इतर अनेक
शेतकरी कुटुंबांनाही या निकषांचा फटका बसू शकतो, असे त्यांनी नमूद केले. सरकारने कर्जमाफीचा मोठा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात मर्यादित शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळेल, असा दावा त्यांनी केला. भविष्यात पुन्हा शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला जाईल आणि आत्महत्यांसारखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. विदर्भ, मराठवाडा आणि सोयाबीन-कापूस पट्ट्यातील पावसाअभावी निर्माण झालेल्या संकटाकडे लक्ष वेधताना वडेट्टीवार म्हणाले की, अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे उगवलेच नाही. काही भागात उगवलेली पिकेही पावसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत सरकारने तातडीने दुबार पेरणीसाठी बियाण्यांची व्यवस्था करावी, शेतकरी प्रतिनिधींची बैठक बोलवावी आणि बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच स्वतः तकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मुंबई आणि पुण्यातील एसआरए तसेच टीडीआर प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली. चौकशी झाल्यास हजारो कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. सत्तेचा गैरवापर करून काही मोजक्या लोकांना फायदा करून दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. महिला, शेतकरी आणि बेरोजगार यांना सरकारने वाऱ्यावर सोडले असून दुसरीकडे उद्योगपतींना मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या जात असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली. सरकारने तातडीने जनहिताचे निर्णय घेतले नाहीत, तर राज्यभरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
