Top 5 This Week

Related Posts

BREAKING

MAHARASHTRA : रोशन कुळे प्रकरणी मुख्य आरोपीला तात्काळ अटक करा

Desk | Mumbai

महाराष्ट्र विधानसभेत आज सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या शेतकरी रोशन कुळे प्रकरणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला जोरदार धारेवर धरले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आलेल्या दिवाकर निकुरे याला अद्याप अटक का करण्यात आलेली नाही, असा थेट सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला. रोशन कुळे या शेतकऱ्याला सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा निर्णय घ्यावा लागला, ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका शेतकऱ्याला अशा टोकाच्या निर्णयापर्यंत जावे लागणे ही राज्याच्या प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याची टीकाही त्यांनी केली. या प्रकरणात इतर काही आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी मुख्य सूत्रधार दिवाकर निकुरे अद्याप मोकाट फिरत असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

“मुख्य आरोपीवर कारवाई होत नसेल, तर सरकार नेमके कोणाचे संरक्षण करत आहे?” असा थेट सवाल त्यांनी सभागृहात केला. वडेट्टीवार यांनी सांगितले की, दिवाकर निकुरे याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप असून, त्याने तब्बल 130 धनादेश (चेक) दिले होते. मात्र हे सर्व धनादेश बाऊन्स झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याच्या बँक खात्यातील आर्थिक व्यवहार आणि इतर पुरावेही तपास यंत्रणांकडे उपलब्ध आहेत. एवढे गंभीर पुरावे समोर असतानाही आरोपीवर कठोर कारवाई का केली जात नाही, याचे उत्तर सरकारने राज्यातील जनतेला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी संपूर्ण सावकारी रॅकेटचा सखोल तपास करण्याची मागणी केली. या प्रकरणामागील आर्थिक व्यवहार, संबंधित व्यक्ती, त्याला मिळत असलेले राजकीय किंवा इतर प्रकारचे संरक्षण यांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी सभागृहात मांडली. “सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून देणे ही सरकारची नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी आहे. त्यामुळे कोणालाही पाठीशी न घालता कायद्यापुढे सर्वांना समान वागणूक देण्यात यावी,” असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. यावर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले. दरम्यान, रोशन कुळे प्रकरणामुळे राज्यातील बेकायदेशीर सावकारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेणाऱ्या सावकारांविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी विविध स्तरांतून होत असून, या प्रकरणातील पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.