Desk | Mumbai
राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विदर्भातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे विजय वडेट्टीवार यांना शिंदे सेनेत येण्याची खुली ऑफर दिल्यानंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे. मात्र, या चर्चांना स्वतः विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम देत आपण काँग्रेसशी कायम निष्ठावंत असल्याचे ठामपणे सांगितले आहे. विदर्भ दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री उदय सामंत यांनी वडेट्टीवार यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. “वडेट्टीवार साहेब कोणाशी चर्चा करत आहेत याची मला माहिती नाही. मात्र विदर्भातील असा ताकदवान नेता आमच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असेल, तर त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करू. ते आले तर निश्चितच पक्षाला फायदा होईल,” असे सामंत यांनी म्हटले. सामंत यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विजय वडेट्टीवार शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. सोशल मीडियावर तसेच विविध माध्यमांमध्ये याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्व अफवांचे खंडन केले.
वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षाने माझ्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला असून महायुती सरकारच्या अपयशावर सातत्याने आवाज उठवला आहे.” याशिवाय त्यांनी काही व्यक्तींवर खोट्या अफवा पसरवून राजकीय बदनामी करण्याचा आरोप केला. “माझ्याविषयी जाणूनबुजून दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत. मी शिंदे गटात जाणार, पक्षप्रवेश करणार किंवा कोणाला भेटलो अशा प्रकारच्या निराधार बातम्या पसरवल्या जात आहेत. माझी भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसच्या विचारांशी माझी बांधिलकी कायम असून पदासाठी किंवा सत्तेसाठी मी माझ्या विचारांशी कधीही तडजोड करणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काही मंडळी मुद्दाम अफवा पसरवून जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. जनतेच्या हिताचे प्रश्न मांडण्याऐवजी अशा अफवांमुळे राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी नमूद केले. उदय सामंत यांच्या ऑफरनंतर आणि विजय वडेट्टीवार यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अशा चर्चांना पुन्हा उधाण येण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. सध्या तरी विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसशी असलेली आपली निष्ठा पुन्हा एकदा जाहीर करत पक्षांतराच्या सर्व चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे.
