Top 5 This Week

Related Posts

BREAKING

GONDIA : भाजपसोबत मतदान केल्याच्या आरोप

Desk | Gondia

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमर वडाळे यांनी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर आणि सदस्यांवर गंभीर आरोप करत पक्षविरोधी कारवाईचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे गटनेते असलेले जिल्हा परिषद सदस्य तसेच दोन नगरसेवक भाजपच्या सदस्यांसोबत मतदानासाठी गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या प्रकरणामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हाध्यक्ष अमर वडाळे म्हणाले की, काँग्रेसचा गटनेता हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे. पक्षातील सर्व सदस्यांच्या विश्वासातून हे पद मिळते. त्यामुळे जर गटनेत्याने किंवा इतर कोणत्याही सदस्याने पक्षाशी दगाबाजी केली असेल, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. अशा प्रकारचे वर्तन पक्षशिस्तीमध्ये बसणारे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वडाळे यांनी सांगितले की, पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रितपणे संबंधित सदस्यांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्याचा विचार करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात काही जिल्हा परिषद सदस्य, दोन नगरसेवक आणि इतर काही सदस्यांची नावे चर्चेत असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, मतदान प्रक्रियेदरम्यान पक्षातील काही सदस्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याची चर्चा रंगत असली तरी निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत अधिकृत भूमिका घेणे योग्य ठरणार नसल्याचेही वडाळे यांनी नमूद केले. निकालानंतर सर्व बाबींची सखोल चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या अधिकृत

उमेदवाराविरोधात मतदान झाले असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित सदस्यांवर पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाचा व्हीप असताना विरोधी उमेदवाराला मतदान करणे हा गंभीर शिस्तभंग मानला जातो. त्यामुळे या प्रकरणाकडे काँग्रेस नेतृत्व गांभीर्याने पाहत आहे. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकारण तापले असून आगामी काळात काँग्रेसमध्ये आणखी मोठे राजकीय परिणाम दिसू शकतात. निवडणुकीच्या निकालानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता असून संबंधित सदस्यांवर नेमकी कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजप आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र होत असताना दुसरीकडे पक्षांतर्गत नाराजी आणि कथित क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेससमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. आता पक्ष नेतृत्व कोणता निर्णय घेते आणि आरोपांमध्ये किती तथ्य आढळते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.