Top 5 This Week

Related Posts

BREAKING

GADCHIROLI : बदलताच पक्ष कार्यालयात तोडफोडीचा आरोप

Desk | Gadchiroli

गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला असून, जिल्हाप्रमुख पदावरील बदलानंतर पक्ष कार्यालयात तोडफोड झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाने अलीकडेच गडचिरोली आणि आरमोरी   धानसभा मतदारसंघासाठी पवन गेडाम, तर अहेरी विधानसभा मतदारसंघासाठी दिलीप सुरपाम यांची  ल्हाप्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली. या निर्णयामुळे यापूर्वी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे वासुदेव शेडमाके नाराज झाल्याची चर्चा आहे. याच नाराजीतून पक्ष कार्यालयात तोडफोड झाल्याचा आरोप नव्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. आरोपानुसार, संतप्त कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात घुसून पीओपी बोर्ड फोडले, टेबल-खुर्च्यांची तोडफोड केली, तसेच पंखे, एसी आणि बल्बसह इतर साहित्यही काढून नेले.

या घटनेमुळे कार्यालयाचे नुकसान झाले असून, पक्षाच्या स्थानिक संघटनेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे  दरम्यान, नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सामान्य रुग्णालयात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम सुरू असतानाच हा प्रकार घडला. कार्यक्रमादरम्यान माजी जिल्हाप्रमुख आणि त्यांच्या काही समर्थकांनी पक्ष कार्यालयात येत तोडफोड सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच ते कार्यालयात पोहोचले आणि संबंधितांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांना पाचारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणानंतर नव्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “यापुढे कोणत्याही माजी किंवा विद्यमान पदाधिकाऱ्याने कार्यालयात अशा प्रकारचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कठोरपणे प्रत्युत्तर दिले जाईल,” असा इशाराही दिला आहे. त्यामुळे या वादाला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न करत असताना, गडचिरोलीतील हा अंतर्गत वाद पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतो. कार्यकर्त्यांमधील मतभेद आणि पदांवरील नाराजी आता उघडपणे समोर येत असल्याने पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेणार, वासुदेव शेडमाके यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार का, तसेच गडचिरोलीतील संघटनात्मक वादावर पडदा कसा पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गडचिरोलीतील या घडामोडींमुळे ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून, येत्या काळात या वादाचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही