Desk | Nagpur
नागपूर विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. अनेक मतदार आणि नगरसेवक अचानक संपर्काबाहेर गेल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना अतुल लोंढे म्हणाले की, निवडणुकीच्या निमित्ताने विविध पक्षांच्या मतदारांशी आणि नगरसेवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक नगरसेवकांशी यापूर्वी भेटी झाल्या होत्या आणि सकारात्मक चर्चा देखील झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विशेषतः भाजपशी संबंधित अनेक नगरसेवक संपर्कात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. “जवळपास ५० टक्क्यांहून अधिक मतदारांच्या भेटी झाल्या होत्या. अनेक नगरसेवकांशी संवाद झाला होता. मात्र, आता हेच नगरसेवक अचानक सापडत नाहीयेत.
त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. आमचे मतदार कुठे गेले, याचा शोध घ्यावा,” अशी मागणी लोंढे यांनी केली. भाजपवर निशाणा साधताना त्यांनी आरोप केला की, भीतीपोटी भाजपने आपल्या नगरसेवकांना गोवा, मुंबई, हैदराबाद आणि जम्मू-काश्मीरसारख्या ठिकाणी पाठवले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्याशी संवाद साधता येत नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, भाजपच्या सहयोगी पक्षांतील काही नगरसेवक मात्र भेटल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या प्रचार मोहिमेचा भाग म्हणून मतदारांना आवाहन करणारे पत्र कार्यकर्त्यांमार्फत घराघरात पोहोचवले जात असल्याचे लोंढे यांनी सांगितले. “माझे कार्यकर्ते नगरसेवकांच्या घरी जाऊन पत्र देत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी संबंधित नगरसेवक बाहेरगावी गेल्याचे सांगितले जात आहे. काहीजण सहलीला गेल्याचेही समजत आहे,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. “जनता काही समजत नाही, जनता खूप खुळी आहे, असे भाजपला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. मतदार सर्व परिस्थिती पाहत आहेत आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतील,” असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, नागपूर विधानपरिषद पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून, विविध राजकीय पक्षांकडून मतदारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता या प्रकरणात निवडणूक आयोग कोणती भूमिका घेतो आणि भाजपकडून या आरोपांना काय उत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
