Desk | Mumbai
राज्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना सरकारकडून इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, दुसरीकडे डिझेल खरेदीवर निर्बंध लादण्यात आल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “एकीकडे इंधन टंचाई नसल्याचे सांगितले जाते आणि दुसरीकडे डिझेल खरेदीवर मर्यादा घातल्या जातात. सरकारच्या या दुटप्पी भूमिकेमुळे सामान्य नागरिक, शेतकरी आणि वाहतूकदार अडचणीत सापडले आहेत.” त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हीच का जनतेला केंद्रातील बारा वर्षांच्या सत्तेची भेट आहे, असा सवाल केला. ऐन खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते.
अशा परिस्थितीत डिझेल खरेदीवर प्रतिदिन मर्यादा आणल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. “बळीराजाला आधीच संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यात सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे,” अशी टीकाही त्यांनी केली. याशिवाय इंधनाची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, त्याची शिक्षा सर्वसामान्यांना दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. “शेतकरी, कष्टकरी, वाहतूक व्यवसायाशी संबंधित लोक आणि छोटे उद्योजक यांचे कंबरडे मोडण्याचे काम हे सरकार करत आहे,” असे ते म्हणाले. सामान्य नागरिकांनी किती इंधन खरेदी करायचे, हे देखील सत्ताधाऱ्यांनी ठरवायचे का, असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. वाढती महागाई, इंधनाचा प्रश्न आणि जनतेच्या दैनंदिन अडचणींकडे दुर्लक्ष करून सरकार केवळ आश्वासनांची खैरात करत असल्याचा आरोप त्यांनी केला. “जनतेला दिलासा देण्याऐवजी निर्बंध लादणारे हे सरकार आहे. बारा वर्षे सत्तेत राहूनही जर नागरिकांना इंधनासाठी रांगेत उभे राहावे लागत असेल, तर हे सरकारच्या अपयशाचे द्योतक आहे,” असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला.
