Top 5 This Week

Related Posts

BREAKING

BULDHANA : कचोरी सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

Desk | Buldhana

राज्यभर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून कचोरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कच्च्या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. शेगाव हे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे दर्शनासाठी येणारे भाविक आवर्जून प्रसिद्ध शेगाव कचोरीचा आस्वाद घेतात. त्यामुळे या कचोरीच्या गुणवत्तेबाबत सातत्याने चर्चा होत असते. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने ही तपासणी मोहीम राबवली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार राज्यभरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, खाद्यपदार्थ विक्रेते आणि प्रसिद्ध खाद्यपदार्थ केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये आणि बाजारात भेसळयुक्त पदार्थांची विक्री रोखता यावी, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या कारवाईदरम्यान कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे खाद्यतेल, बेसन, मसाले तसेच इतर कच्च्या पदार्थांचे नमुने अधिकाऱ्यांनी जप्त केले. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. संबंधित कचोरी सेंटरमध्ये स्वच्छता, अन्नपदार्थ साठविण्याची पद्धत तसेच वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता याचीही पाहणी करण्यात आली. तपासणी अहवालामध्ये भेसळयुक्त अथवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ आढळल्यास संबंधित आस्थापनाविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे शेगावातील खाद्य व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. शेगाव कचोरी ही राज्यभर प्रसिद्ध असल्याने या तपासणीकडे भाविकांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच कचोरीच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट चित्र समोर येणार आहे. याच विशेष मोहिमेअंतर्गत अलीकडेच शिर्डी येथील साई मंदिर परिसरातील प्रसाद विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली होती. या तपासणीनंतर अनेक विक्रेत्यांनी पेढ्यांवर पॅकेजिंगची माहिती आणि एक्सपायरी तारीख नमूद करण्यास सुरुवात केली आहे. काही नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाची ही मोहीम महत्त्वाची मानली जात असून, भेसळ करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.