Top 5 This Week

Related Posts

BREAKING

वर्धा : सर्पमित्र व वनविभागाच्या तत्परतेमुळे मिळाले अजगरला जीवनदान!

डेस्क | आष्टी

शेतात गवत कापणीचे काम सुरू असताना अचानक एक महाकाय अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळबळ उडाली. मात्र, शेतमालक, स्थानिक सर्पमित्र आणि वनविभागाच्या कमालीच्या सतर्कतेमुळे या अजगराला कोणतीही इजा न पोहोचवता अत्यंत सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले. वनविभागाच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी परिसरातील शेतकरी किशोर ढबाले यांच्या शेतात नेहमीप्रमाणे शेतमजूर गवत कटाईचे काम करत होते. काम सुरू असतानाच मजुरांना अचानक एका झुडपात एक प्रचंड मोठा साप दिसून आला. एवढा मोठा साप पाहून मजुरांची चांगलीच भंबेरी उडाली. मजुरांनी तात्काळ ही माहिती शेतमालक किशोर ढबाले यांना दिली.

साप निघाल्यानंतर अनेकदा भीतीपोटी त्याला इजा होण्याची शक्यता असते. मात्र, शेतमालक किशोर ढबाले यांनी कोणताही अनुचित प्रकार न करता किंवा सापाला कोणतीही दुखापत न पोहोचवता, तातडीने स्थानिक सर्पमित्र वैभव मेंढे आणि प्रितम गायकी यांच्याशी संपर्क साधून त्यांना शेतात पाचारण केले.

घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी केली असता, तो साप ‘अजगर’ जातीचा असल्याचे स्पष्ट झाले.

सर्पमित्र वैभव मेंढे आणि प्रितम गायकी यांनी अत्यंत कौशल्याने आणि काळजीपूर्वक त्या महाकाय अजगराला पकडले. सापाला सुरक्षितपणे पकडल्यानंतर या घटनेची अधिकृत नोंदणी वनविभागाकडे करण्यात आली.

या मोहिमेत सर्पमित्रांना सहकार्य करण्यासाठी ऋषिकेश गवळी, विनायक सोमनाथे, विपीन उमाळे, उमेश गुल्हाने आणि मंगेश कोहळे प्रामुख्याने उपस्थित होते.

आष्टी वनविभागाचे आरएफओ (RFO) ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनात आणि वनरक्षक आर. एस. गायकवाड यांच्या उपस्थितीत सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर या अजगराला मानवी वस्तीपासून दूर, सुरक्षित अशा नैसर्गिक जंगलात सुखरूप सोडून देण्यात आले.

शेतकऱ्याचा समजूतदारपणा आणि सर्पमित्रांच्या वेळेवर घेतलेल्या शोधमोहिमेमुळे एका वन्यजीवाला जीवदान मिळाल्याने वन्यजीव प्रेमींकडून या सर्वांचे कौतुक होत आहे.