Top 5 This Week

Related Posts

BREAKING

NAGPUR : १३ ग्रॅम एमडी ड्रग्जसह तिघे जेरबंद

Desk | Nagpur

शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या एनडीपीएस पथकाने मोठी कारवाई करत १३ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह तिघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात कार्यरत असलेल्या अमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी या प्रकरणातील फरार मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी क्राईम ब्रँचचे एनडीपीएस पथक नियमित गस्त घालत असताना सिरसपेट परिसरातील युनियन बँकेच्या मागील रस्त्यावर काही युवक संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेत पंचांसमक्ष त्यांची झडती घेतली. झडतीदरम्यान आरोपींकडून १३ ग्रॅम एमडी पावडर, तीन मोबाईल फोन आणि एक पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख आरिफ खान बब्बू खान पठाण, प्रांजल नरेंद्र गज आणि कुणाल दिलीप राऊत (जीप काटे) अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत हजारो रुपयांमध्ये असल्याचे सांगितले असून, त्याचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी आरिफ खान याने फरार आरोपी शहबाज पठाण उर्फ अमू याच्याकडून एमडी ड्रग्जची खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, अटक करण्यात आलेले इतर दोघे आरोपी आरिफकडून अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी आले असल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. विशेष म्हणजे, आरिफ खान याच्याविरुद्ध यापूर्वीही जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे तो पूर्वीपासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या संपूर्ण ड्रग्ज नेटवर्कमागील इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. फरार आरोपी शहबाज पठाण उर्फ अमू याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नागपूर शहरात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, भविष्यात अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत