डेस्क | मुंबई
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि स्वतःला ‘कूल’ दाखवण्याच्या नादात काही जण कोणत्याही मर्यादा ओलांडताना दिसत आहेत. मात्र, विनोदाच्या नावाखाली महिलांचा सन्मान आणि मानवी मूल्यांची पायमल्ली केल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, याचं उदाहरण सध्या समोर आलं आहे. प्रसिद्ध क्राऊड वर्क कॉमेडियन प्रणीत मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, राष्ट्रीय महिला आयोगानेही थेट हस्तक्षेप केला आहे.
9 जून रोजी प्रणीत मोरेच्या स्टँड-अप शोमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला. शोमध्ये उपस्थित असलेल्या हिमांशू जांगरा याने एका मुलीसोबतच्या डेटचा अनुभव सांगताना, तिच्या संमतीशिवाय शारीरिक जवळीक साधल्याचा दावा केला. या गंभीर विधानावर आक्षेप घेण्याऐवजी प्रणीत मोरे हसताना दिसला आणि त्याने त्या व्हिडिओला “Peak Gurgaon Content” असे शीर्षक देऊन सोशल मीडियावर अपलोड केले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वाढत्या टीकेनंतर प्रणीत मोरेने माफी मागत व्हिडिओ हटवला, तर हिमांशू जांगरा याला त्याच्या कंपनीने नोकरीवरून काढून टाकल्याची माहिती समोर आली.
यानंतर प्रणीत मोरेच्या जुन्या व्हिडिओंची तपासणी करताना आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. त्यात केईएम रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. सेजल पवार या वैद्यकीय अभ्यासासाठी वापरण्यात येणाऱ्या मृतदेहांबाबत आक्षेपार्ह विनोद करताना दिसल्या. या वक्तव्यावरही शोमधील प्रेक्षक आणि प्रणीत मोरे हसताना दिसले.
या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून, केईएम प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली आहे. सोशल मीडियावर त्यांचे वैद्यकीय लायसन्स रद्द करण्याची मागणीही जोर धरत आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. हरियाणा पोलिसांकडून एका आठवड्यात अहवाल मागवण्यात आला असून, प्रणीत मोरे आणि हिमांशू जांगरा यांना 22 जून रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी प्रणीत मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत.
- BNS कलम 75(1) व 75(3) – लैंगिक अर्थाच्या टिप्पणी आणि त्यांचा प्रसार
- BNS कलम 294 – अश्लील मजकूर सार्वजनिकरित्या प्रसारित करणे
- BNS कलम 353(2) – समाजात तेढ निर्माण करणारे विधान पसरवणे
- IT Act कलम 67 – इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील मजकूर प्रसारित करणे
सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा वादग्रस्त मजकूर चुकून नव्हे तर मुद्दाम रेकॉर्ड करून एडिट करण्यात आला आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला. व्ह्यूज, फॉलोअर्स आणि आर्थिक लाभ मिळवणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात शोचे आयोजक आणि व्हेन्यू व्यवस्थापनाचीही चौकशी सुरू आहे.
