Top 5 This Week

Related Posts

BREAKING

नागपूर : जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट!

डेस्क | नागपूर 

उपराजधानी नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, यशोधरा नगर परिसरात घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. जुन्या वैमनस्यातून 22 वर्षीय तरुणाची भररस्त्यात धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना टीपू सुलतान चौकातील एका कॅफेसमोर घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

मृत तरुणाचे नाव मोहम्मद सलमान अन्सारी (वय 22) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री सलमान हा आपल्या मित्राच्या ‘टाइमपास झोन कॅफे’ बाहेर उभा राहून मोबाईलवर बोलत होता. त्याचवेळी मुख्य आरोपी मुजम्मिल उर्फ मुज्जू हसन अली हा एका अल्पवयीन साथीदारासह दुचाकीवरून तेथे पोहोचला.

सलमान एकटाच असल्याचे पाहून आरोपींनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. मुजम्मिलने जवळील धारदार चाकू काढून सलमानच्या छातीवर, खांद्यावर आणि हातावर सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सलमानला बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही आणि तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि मित्रांनी सलमानला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्रावामुळे त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी आरोपी मुजम्मिल याने सलमानच्या बहिणीची कथित छेड काढली होती. याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. त्या घटनेनंतर आरोपीच्या मनात सलमानविरोधात तीव्र संताप आणि सूडाची भावना निर्माण झाली होती. पोलिसांच्या भीतीमुळे आरोपीने परिसर बदलला होता, मात्र सलमानवर त्याने पाळत ठेवली होती.

याच जुन्या वैमनस्यातून आरोपीने आपल्या साथीदारासह कट रचून सलमानवर प्राणघातक हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलीस आणि डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता आरोपींची संपूर्ण हालचाल त्यामध्ये कैद झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करत मुख्य आरोपी मुजम्मिल आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले.

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या हत्याकांडात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे.

“मृतक आणि मुख्य आरोपी यांच्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मुख्य आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे,” अशी माहिती यशोधरा नगर पोलिसांनी दिली.

भरवस्तीत आणि वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे यशोधरा नगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.