Desk | Nagpur
ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली असून, काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते Vijay Wadettiwar यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ओबीसी समाजाला स्वतंत्र कॉलम देऊन जनगणना करण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप केला. वडेट्टीवार म्हणाले की, “ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना न करण्यामागे सरकारची भीती आहे. जर ओबीसींची खरी लोकसंख्या समोर आली, तर त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट, शिष्यवृत्ती, आरक्षण आणि इतर योजनांमध्ये वाटा द्यावा लागेल. त्यामुळेच सरकार या प्रश्नापासून पळ काढत आहे.” यावेळी त्यांनी “जितकी संख्या भारी, तितकी हिस्सेदारी” ही भूमिका पुन्हा अधोरेखित केली. ओबीसी समाजाला त्यांचा हक्काचा वाटा मिळावा यासाठी स्वतंत्र जनगणना आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जनगणनेला बहिष्कार घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. “सरकारने गुन्हे दाखल करायचे असतील तर करू द्या.
आम्ही घाबरणार नाही. गरज पडली तर संपूर्ण ओबीसी समाजासह आंदोलन करू आणि तुरुंगात जाण्याचीही तयारी ठेवू,” असा इशारा त्यांनी दिला. पंतप्रधान Narendra Modi यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, “कार्यकाळाची तुलना होऊ शकते, पण देशाचे पहिले पंतप्रधान Jawaharlal Nehru यांच्या कामाशी तुलना होऊ शकत नाही. मोदी सरकारच्या १२ वर्षांत देशाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती अधिकच बिकट झाली असून जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.” दरम्यान, राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये वित्त खात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस नेते Vikas Thakre यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना फेटाळून लावत, नागपूर शहर व जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी जनगणना, आरक्षणातील वाटा आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावरून येत्या काळात राज्यात आणि देशभरात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
