Desk | Mumbai
राज्यातील शेतकरी कर्जमाफी, वाढती महागाई आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारची कर्जमाफी योजना ही केवळ आकडेवारीचा खेळ असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होणार नसल्याचा आरोप त्यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले की, सरकारकडून लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरी त्यासाठी घालण्यात आलेल्या अटी आणि शर्तींमुळे अनेक शेतकरी या योजनेच्या बाहेर राहणार आहेत. ही सरसकट कर्जमाफी नसून फसवी आणि बनवाबनवीची कर्जमाफी असल्याची टीका त्यांनी केली. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर बोलताना त्यांनी केंद्रातील काँग्रेस सरकारच्या काळातील निर्णयांचा उल्लेख केला. शरद पवार कृषिमंत्री असताना आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एकाच निर्णयात सुमारे 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती,
असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्या काळात सोयाबीनला चार ते पाच हजार रुपयांचा भाव मिळत होता, तर आज शेतकऱ्यांना योग्य हमीभावही मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारकडे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी निधी नाही, असा दावा चुकीचा असल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने आपली जमीन आणि मालमत्ता विक्री किंवा लावातून मिळणारा निधी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वापरावा. शेतकऱ्यांना दिलासा देणे हीच सरकारची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. महागाईच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. उज्ज्वला योजनेमुळे चुलीवरून गॅसवर आलेल्या कुटुंबांना आता वाढत्या सिलेंडर दरांमुळे पुन्हा चुलीकडे जाण्याची वेळ येत असल्याचा दावा त्यांनी केला. गॅस सिलेंडरचे दर हजार रुपयांच्या पुढे गेले असून येत्या काळात ते आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. “जनतेच्या डोळ्यात पुन्हा धूर आणि अश्रू आणण्याचे काम हे सरकार करत आहे. सामान्य, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे महागाईमुळे त्रस्त झाली आहेत. सरकारला चटके कसे द्यायचे हे जनता योग्य वेळी ठरवेल,” असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील शेतकरी, महागाई आणि कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
