Top 5 This Week

Related Posts

BREAKING

NASHIK : हिरेंचा दावा, राजकारण तापलं!

Desk | Nashik

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. प्रसाद हिरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत तब्बल दीड तास चर्चा झाल्याचा दावा करत, आपण आपल्या भूमिकेबाबत त्यांना सविस्तर माहिती दिल्याचे सांगितले. माध्यमांशी बोलताना हिरे म्हणाले की, शिवसेनेच्या काही नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी अधिकृत उमेदवाराबाबतची नाराजी स्पष्टपणे मांडली. “समोरचा उमेदवार मतदारांच्या कोणत्याही कामी आला नाही. त्याने अनेक मतदारांची प्रतारणा आणि फसवणूक केली आहे. त्यामुळे तो निवडून येण्याची शक्यता नाही आणि त्याचा पराभव निश्चित आहे,” असा दावा त्यांनी केला. यावेळी प्रसाद हिरे यांनी आपल्या प्रचाराची भूमिकाही स्पष्ट केली. कोणावरही वैयक्तिक टीका किंवा शिवीगाळ न करता,

संविधानिक मार्गाने आणि सकारात्मक प्रचाराच्या माध्यमातून मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “भांडण, वाद किंवा कटुता न करता मी मतदारांपर्यंत पोहोचत आहे. मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून अनेकांची मने जिंकण्यात मी यशस्वी ठरलो आहे,” असेही ते म्हणाले. दरम्यान, आपल्या उमेदवारीमागील कारण स्पष्ट करताना हिरे यांनी महत्त्वाचे विधान केले. “माझी बंडखोरी भारतीय जनता पक्षाविरोधात नाही आणि शिवसेनेविरोधातही नाही. माझा विरोध केवळ उमेदवाराला आहे. पक्षांविरोधात कोणतीही भूमिका नसून मतदारांच्या भावना लक्षात घेऊन मी निवडणूक लढवत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक विधान परिषद निवडणुकीत आधीच राजकीय समीकरणे बदलत असताना प्रसाद हिरेंच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीतील वातावरण आणखी तापले आहे. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी उघडपणे अधिकृत उमेदवारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने आगामी काळात या निवडणुकीत आणखी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे