Top 5 This Week

Related Posts

BREAKING

MAHARASHTRA : 14 हजार गावांचा कारभार ठप्प; जबाबदार कोण?

Desk | sambhajinagar

राज्यातील तब्बल 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याने ग्रामीण भागातील प्रशासन पूर्णपणे ठप्प झाल्याचा आरोप आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केला आहे. निवडणुका वेळेत न घेणे हे लोकशाहीसाठी घातक असून यामुळे गावांचा विकास अनेक वर्षे मागे जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पेरे पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतींच्या निवडणुका सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे हजारो गावांमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत, अनेक ठिकाणी प्रशासकही नाहीत आणि गावांचा दैनंदिन कारभार ठप्प झाला आहे. जवळपास 50 हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

“घटनेतील 73 व्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घेणे बंधनकारक आहे. मुदत संपण्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. मात्र सहा महिने उलटूनही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. हे निव्वळ मनमानी कारभाराचे उदाहरण आहे,” असा आरोप त्यांनी केला. पेरे पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “वेळेत निवडणुका न झाल्याने गावातील विकासकामे, पाणीपुरवठा, ठराव, निधी वितरण यासारखी महत्त्वाची कामे रखडली आहेत. सहा महिने कारभार ठप्प राहिला तर गाव सहा वर्षे मागे जाते,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त T. N. Seshan यांची आठवण काढत, “सेशन साहेब आज असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती,” असेही म्हटले. दरम्यान, राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींच्या निवडणुका किमान सहा महिने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. ग्रामविकास विभागाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रशासक नियुक्त करण्याचे आदेशही जारी केले होते. ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रश्न केवळ राजकीय नसून ग्रामीण विकासाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे शासन आणि राज्य निवडणूक आयोगाने तातडीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करून गावांचा कारभार पूर्ववत करावा, अशी मागणी भास्कर पेरे पाटील यांनी केली.