डेस्क | BHANDARA
4 जण गंभीर जखमी, कार-पिकअपचा चक्काचूर! ओव्हरटेक करण्याच्या नादात तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील खापा परिसरामध्ये तीन वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसून भीषण तिहेरी अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात एकूण चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात 16 मे रोजी सायंकाळी 4:20 वाजताच्या सुमारास घडला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, कार आणि पिकअप वाहनाचा समोरील भागाचा पार चक्काचूर झाला आहे.
ओव्हरटेक ठरले अपघाताचे कारण
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरवरून बालाघाटच्या दिशेने कार (क्र. MH-25/BH-2354) जात होती, तर तुमसरवरून रामटेककडे पिकअप वाहन (क्र. MH-28/AB-3097) येत होते. याच दरम्यान खापा गावातून गिट्टी (खडी) भरून एक ट्रॅक्टर (क्र. MH-35/AW-3821) महामार्गावर निघाला होता. महामार्गावर एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात या तिन्ही वाहनांची खापा परिसरात समोरासमोर अत्यंत जोरदार धडक बसली.
जखमींची नावे आणि तपशील
या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:
विक्रांत गंगाप्रसाद सरनागत (वय 36, रा. ज्ञानेवाडा, बालाघाट) – कार चालक
निवांत बेनीसिंग पारधी (रा. खापा, बालाघाट)
प्रकाश फूलसुंगे (रा. बांधटोला) – ट्रॅक्टर चालक
ओमकार संजय काटेवार (वय 27, रा. कन्हाण)
स्थानिक नागरिक ठरले ‘देवदूत’
अपघात घडताच तिन्ही वाहनांच्या धडकेचा मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून खापा परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. रामदास बडवाईक, नाना ठवकर, रोशन मने, सागर धोत्रे व इतर गावकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले आणि स्वतःच्या वाहनांनी उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले. गावकऱ्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.
पोलिसांकडून तपास सुरू
अपघाताची माहिती मिळताच तुमसर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण सय्याम आणि बीट जमादार गणेश मन्नाडे या घटनेचा पुढील तपास करत आहेत. महामार्गावरील वाढत्या ओव्हरटेकिंगच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
