Top 5 This Week

Related Posts

Bhandara : दोन महिन्यांपासून चुलीवर स्वयंपाक; ‘डिलिव्हरी’चा मेसेज मात्र सिलिंडर गायब!

डेस्क | नांदाफाटा / कोरपना

कोरपना तालुक्यातील तळोधी येथील गरीब आणि अशिक्षित ग्राहकांची गॅस एजन्सीधारकाकडून फसवणूक केली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ग्राहकांच्या नावाने सिलिंडर ‘डिलिव्हर’ झाल्याचे मेसेज मोबाईलवर येतात, मात्र प्रत्यक्षात सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त ग्राहकांनी आता थेट इंडियन ऑइलच्या एरिया सेल्स अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

नेमकी घटना काय?

तळोधी येथील मनोहर दोरखंडे यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी 7  मे रोजी सिलिंडर बुक केले होते. परंतु, एजन्सीने “साठा उपलब्ध नाही” असे सांगून त्यांना परत पाठवले. धक्कादायक बाब म्हणजे, दुसऱ्याच दिवशी 8 मे रोजी त्यांच्या मोबाईलवर सिलिंडर ‘डिलिव्हर’ झाल्याचा संदेश आला. असाच प्रकार 23 मार्च 2026 रोजीही घडला होता, जेव्हा सिलिंडर वितरित झाल्याचे दाखवले गेले पण प्रत्यक्षात ते मिळालेच नव्हते.

दोन महिन्यांपासून वनवन

22 फेब्रुवारी 2026 पासून या कुटुंबाला एकही सिलिंडर मिळालेले नाही. यामुळे त्यांना मागील दोन महिन्यांपासून लाकडे पेटवून चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. “आम्ही अशिक्षित असल्याने आम्हाला मोबाईलवरील मेसेज समजत नाहीत. एजन्सीमधील कर्मचारी आमच्या मोबाईलवरून बुकिंग करतात आणि आमच्या नावाने सिलिंडर उचलून आमची फसवणूक करत आहेत,” असा आरोप तक्रारदार ग्राहक शकुंतला दोरखंडे यांनी केला आहे.

इतर ग्राहकांचीही तीच तक्रार

केवळ तळोधीच नव्हे, तर सोनुर्ली (गाडेगाव) येथील ग्राहक उंदरु बांदूरकर यांनीही अशीच कैफियत मांडली आहे. 28 मार्च रोजी त्यांचे सिलिंडर डिलिव्हर दाखवण्यात आले, मात्र ते त्यांना मिळालेच नाही. गेल्या 15 दिवसांपासून ते एजन्सीच्या फेऱ्या मारत असून अधिकारी तक्रारीची दखल घेत नसल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धट वागणूक आणि कारवाईची मागणी

गॅस गोदामातील कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना “तुला देणार कुठून, ज्यांना काय करायचे ते करून घ्या,” अशा शब्दांत उद्धट वागणूक दिली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मनोहर दोरखंडे यांनी इंडियन ऑइलचे एरिया सेल्स ऑफिसर आकाश आमले यांच्याकडे केली आहे. या तक्रारीची प्रत कोरपना तहसीलदार आणि चंद्रपूर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे.