Top 5 This Week

Related Posts

BREAKING

DELLHI : जातनिहाय जनगणनेसाठी वडेट्टीवारांचा एल्गार!

Desk | Dellhi

देशात अचूक जातनिहाय जनगणना करण्यात यावी आणि प्रत्येक जातीची स्वतंत्र नोंद होण्यासाठी जनगणना फॉर्ममध्ये स्वतंत्र ड्रॉप-डाउन यादी उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर सामाजिक न्यायाचा एल्गार पुकारण्यात आला आहे. या मोर्चात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी सहभाग घेत आपली भूमिका मांडली. जातनिहाय जनगणना आणि सर्व समाजघटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, आज दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रामलीला मैदानावर आयोजित सामाजिक न्यायाच्या एल्गार मोर्चासाठी रवाना झालो. या मोर्चामागील प्रमुख उद्देश देशात अचूक जातनिहाय जनगणना व्हावी हा आहे. जनगणनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक जातीची स्वतंत्र आणि योग्य नोंद होणे आवश्यक असल्याचे वडेट्टीवार यांनी आपल्या निवेदनातून अधोरेखित केले. त्यासाठी जनगणना फॉर्ममध्ये ड्रॉप-डाउन यादीची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या मते, जातनिहाय जनगणना ही केवळ आकडेवारी

गोळा करण्याची प्रक्रिया नसून विविध समाजघटकांची वास्तविक सामाजिक परिस्थिती समजून घेण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. देशातील कोणत्या समाजघटकाची लोकसंख्या किती आहे, त्यांना उपलब्ध असलेल्या संधी आणि प्रतिनिधित्वाची स्थिती काय आहे, याची अचूक माहिती मिळणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे सामाजिक न्यायाच्या धोरणांना अधिक प्रभावी दिशा मिळू शकते. या मोर्चातून सामाजिक न्याय, समान संधी आणि प्रत्येक समाजघटकाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, या मागण्यांवर भर देण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांना विकासाच्या प्रक्रियेत समान स्थान मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. तसेच, सामाजिक न्यायाच्या या लढ्यात सहभागी होण्यामागे प्रत्येक समाजघटकाला त्याचा अधिकार मिळवून देण्याची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. जातनिहाय जनगणनेच्या मागणीला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चातून सरकारपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्या सहभागामुळे महाराष्ट्रातील जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता या मागणीवर केंद्र सरकार काय भूमिका घेते आणि जनगणना प्रक्रियेत स्वतंत्र जातनोंदीसाठी कोणते निर्णय घेतले जातात, याकडे लक्ष लागले आहे.