Top 5 This Week

Related Posts

BREAKING

NAGPUR : नागपुरात शस्त्रसाठा जप्त; 3 कट्टे, 2 काडतुसे पोलिसांच्या ताब्यात!

Desk | Nagpur

नागपुरात क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; तीन देशी कट्टे, दोन जिवंत काडतुसे जप्त, एक आरोपी अटकेत नागपूर शहरात अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचने जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत एका कुख्यात आरोपीला तीन देशी बनावटीच्या कट्ट्यांसह दोन जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल फोनसह अटक केली आहे. या कारवाईमुळे नागपुरातील अवैध शस्त्रांच्या नेटवर्कवर पुन्हा एकदा पोलिसांनी मोठा घाव घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेकोसाबाग परिसरातील लेंडी मैदानाजवळील मात्र छाया वाचनालयाच्या परिसरात गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने आकाश राजन थापा याला ताब्यात घेतले. आकाश थापा हा 29 वर्षांचा असून तो मेकोसाबाग, लुंबिनी नगर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडून दोन मॅगझीन असलेले देशी कट्टे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घराचीही झडती घेतली. या झडतीदरम्यान आणखी एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र पोलिसांच्या हाती लागले. अशाप्रकारे एकूण तीन देशी बनावटीची अग्निशस्त्रे, दोन जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1 लाख 57 हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अवैध शस्त्रांचे मध्य प्रदेश कनेक्शन समोर आले आहे. पोलिसांच्या चौकशीत आकाश थापाने ही शस्त्रे आपल्या साथीदारांच्या माध्यमातून मिळाल्याची माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये योगेश शिरिया, अभय नावाचा व्यक्ती आणि मध्य प्रदेशातील खंडवा येथील आकाश भाई नावाच्या कथित शस्त्र पुरवठादाराचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही शस्त्रे कुख्यात आरोपी विशाल मेश्राम याच्या जेलमधून सुटकेच्या वेळी त्याच्या साथीदारांना धमकावण्यासाठी वापरण्याचा कट असल्याचा संशय आहे.

त्यामुळे या प्रकरणाचा संबंध केवळ अवैध शस्त्र बाळगण्यापुरता मर्यादित नसून त्यामागे मोठे गुन्हेगारी नेटवर्क असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात आकाश राजन थापा याच्यासह एकूण चार जणांना आरोपी करण्यात आले आहे. त्यातील योगेश शिरिया, अभय आणि खंडवा येथील आकाश भाई हे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जरीपटका पोलिसांनी आरोपीविरोधात शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रे नेमकी कुठून आणण्यात आली, त्यांचा पुरवठा कोण करत होते आणि या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. या कारवाईमुळे नागपूर शहरातील अवैध शस्त्रांची तस्करी आणि त्यामागील गुन्हेगारी साखळीवर पोलिसांचे लक्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.