Top 5 This Week

Related Posts

BREAKING

NAGPUR : हिंगणा MIDC मध्ये महिंद्रा कामगारांचे आंदोलन; कामकाज ठप्प..

Desk | Nagpur

नागपुरातील हिंगणा MIDC मध्ये महिंद्रा कंपनीच्या कामगारांचे आंदोलन; विविध मागण्यांसाठी काम बंद नागपुरातील हिंगणा एमआयडीसी परिसरातील महिंद्रा कंपनीच्या मुख्य गेटबाहेर कामगारांनी अचानक आंदोलन सुरू केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विविध मागण्यांसाठी मोठ्या संख्येने कामगार एकत्र आले असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे. कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कायमस्वरूपी नोकरी, योग्य प्रमाणात पीएफ कपात, ईएसआय आणि इतर लागू भत्ते, वैद्यकीय सुविधा, साप्ताहिक सुट्टी तसेच कामाचे तास कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, यासोबतच कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. आंदोलन करणाऱ्या कामगारांनी कंपनी व्यवस्थापनावर सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच कामगारांवर कोणताही दबाव आणू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. काही कामगारांच्या म्हणण्यानुसार, त्यांना सुरक्षेशी संबंधित आवश्यक सुविधा आणि उपकरणेही पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कायमस्वरूपी नोकरीचा मुद्दाही या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे. अनेक कामगार दीर्घकाळापासून कंपनीत काम करत असून, त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे आणि त्याबाबत अधिकृत पत्र देण्यात यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

केवळ आश्वासन नको, तर कायमस्वरूपी नोकरीचे पत्र मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका काही आंदोलकांनी व्यक्त केली. दरम्यान, कामगारांनी काही अधिकाऱ्यांकडून दबाव आणला जात असल्याचाही आरोप केला आहे. पालकांना फोन करून मुलांना नोकरीवरून काढण्याची किंवा इतर प्रकारची कारवाई करण्याची धमकी दिल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. या आरोपांमुळे आंदोलनाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. आंदोलन अचानक सुरू झाल्यामुळे कंपनीतील उत्पादन आणि कामकाजावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही कामगार कंपनीच्या आत असल्याचा आणि त्यांना बाहेर येण्यास परवानगी दिली जात नसल्याचाही आंदोलकांनी आरोप केला. मात्र, या आरोपांबाबत कंपनी व्यवस्थापनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. कामगारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मागण्या मान्य होईपर्यंत ते आंदोलनाच्या ठिकाणाहून हटणार नाहीत. दोन दिवस, दोन महिने किंवा त्याहून अधिक काळ लागला तरी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे हिंगणा एमआयडीसी परिसरातील महिंद्रा कंपनीचे कामकाज किती काळ प्रभावित राहणार, तसेच व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये यावर तोडगा कधी निघणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कामगारांच्या मागण्यांवर कंपनी व्यवस्थापन काय भूमिका घेते आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी पुढील काळात कोणती पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.