Desk : Buldana
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी; देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जावं, संजय गायकवाडांचं वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेचे बुलढाणा मतदारसंघातील आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी, अशी मागणी आपण आणि अनेक आमदार करत असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे महायुतीच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा कारभार सांभाळताना राज्याला विकासाच्या दिशेने नेल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबाबत सकारात्मक भावना असल्याचा दावा त्यांनी केला. गायकवाड म्हणाले की, “एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं ही तमाम महाराष्ट्रातील शेतकरी-कष्टकऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे देवेंद्रजींनी केंद्रात जावं आणि एकनाथ शिंदे यांना संधी द्यावी.” ही केवळ आपली वैयक्तिक इच्छा नसून अनेक आमदारांचीही अशीच मागणी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतील वरिष्ठ नेतेच घेतील, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजप नेतृत्व जो निर्णय घेईल, तो मान्य असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरही गायकवाड यांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने चिन्ह मिळत नसेल तर ते गोठवण्यात यावं, अशी भूमिका न्यायालयात मांडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाऊ शकत नाही, अशी भूमिका गायकवाड यांनी व्यक्त केली. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी यापूर्वी दिलेल्या निर्णयांचाही त्यांनी उल्लेख केला. संबंधित निर्णय आमच्या बाजूने असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाबाबतच्या वक्तव्यावरही संजय गायकवाड यांनी टीका केली. मोदी 17 तारखेनंतर पंतप्रधान राहणार नाहीत, तसेच पंतप्रधान म्हणून त्यांचा हा शेवटचा वाढदिवस असेल,
असा दावा संजय राऊत करत असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं. राऊत यांची यापूर्वीची अनेक भाकितं चुकीची ठरल्याचा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट आहे. संजय गायकवाड यांनीही अंतिम निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या हातात असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार का, देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का आणि महायुतीच्या सत्ताकारणात नेमके कोणते बदल होणार, याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
