Desk | Maharashtra
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज युवकांशी संवाद साधणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. देशातील युवक बेरोजगारी, महागाई, शिक्षण आणि रोजगाराच्या गंभीर समस्यांशी झुंज देत असताना या मूलभूत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी संघाचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले की, आजचा भारतीय युवक मोठ्या अपेक्षांनी शिक्षण घेत आहे. मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्याला नोकरी मिळत नाही. अनेक स्पर्धा परीक्षा वेळेवर होत नाहीत, काही परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना घडतात, तर लाखो पदे रिक्त असूनही भरती प्रक्रिया रखडलेली आहे. अशा परिस्थितीत युवकांच्या मनात सरकारबद्दल तीव्र नाराजी निर्माण झाली असून त्यांना घोषणांपेक्षा ठोस कृतीची अपेक्षा आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आजच्या युवकांसाठी नेमका कोणता विधायक कार्यक्रम आहे? युवकांच्या हाताला रोजगार मिळावा, उद्योगधंद्यांच्या संधी वाढाव्यात, शिक्षण अधिक दर्जेदार व्हावे आणि कौशल्य विकासासाठी प्रभावी धोरण राबवले जावे, यासाठी संघ किंवा केंद्र सरकारकडे ठोस आराखडा आहे का?
केवळ विचारधारा सांगून किंवा कार्यक्रम आयोजित करून युवकांचे भविष्य घडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. वडेट्टीवार यांनी आरोप केला की, देशातील अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये संघ विचारसरणीशी संबंधित व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केले जात आहे. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जात आहे. मात्र, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजप नेत्यांची मुलेही अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील, यात कोणालाही आक्षेप नाही. मात्र, सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना रोजगार, चांगले शिक्षण, उद्योग आणि करिअरच्या संधी मिळणार की नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. देशातील युवकांना आज देशभक्ती शिकवण्यापेक्षा त्यांच्या भविष्याची हमी देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. युवकांच्या हाताला काम नसेल, शिक्षणानंतरही नोकरी नसेल आणि वाढत्या महागाईमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण होत असेल, तर केवळ भाषणे आणि कार्यक्रमांमुळे परिस्थिती बदलणार नाही. सरकारने युवकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “देशातील युवकांना घोषणांची गरज नाही, तर रोजगाराची गरज आहे. खोट्या आश्वासनांची गरज नाही, तर शिक्षण, उद्योगनिर्मिती आणि सुरक्षित भविष्याची हमी हवी आहे. देशभक्तीचे धडे देण्यापूर्वी सरकारने बेरोजगारी, शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडून त्यावर प्रभावी उपाययोजना कराव्यात,” असे विजय वडेट्टीवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले. युवकांच्या वाढत्या असंतोषाकडे दुर्लक्ष करून केवळ प्रतिमा सुधारण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ठोस निर्णय घेणे हीच आजच्या काळाची खरी गरज असल्याचेही वडेट्टीवार यांनी अधोरेखित केले.
