Top 5 This Week

Related Posts

BREAKING

MAHARASHTRA : आर्थिक भाराचा बहाणा; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा.

Desk | Maharashtra

निवडणुकीपूर्वी मोठ्या गाजावाजात विविध कल्याणकारी योजनांची घोषणा करणाऱ्या महायुती सरकारवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. विशेषतः महिलांसाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनांबाबत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी संताप व्यक्त करत, “निवडणुकीत आश्वासनांची खैरात केली आणि निवडणुकीनंतर आर्थिक भाराचा बहाणा करत जनतेची फसवणूक केली,” असा आरोप केला. वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महिलांना, गरीब कुटुंबांना आणि अंत्योदय लाभार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या जाहिराती देण्यात आल्या. सरकारने विविध योजनांची घोषणा करत स्वतःला जनतेचे हितचिंतक म्हणून सादर केले. मात्र निवडणूक संपताच राज्याची तिजोरी रिकामी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी केलेली आश्वासने ही केवळ मतांसाठी होती का, असा प्रश्न आता राज्यातील जनतेसमोर उभा राहिला आहे.

यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या आर्थिक नियोजनावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. “जर एखादी योजना राज्याच्या तिजोरीवर इतका मोठा आर्थिक भार टाकणार होती, तर तिची घोषणा करताना सरकारने आर्थिक अभ्यास केला नव्हता का? त्यावेळी अर्थतज्ज्ञ सुट्टीवर होते का? की निवडणुकीच्या रणधुमाळीत आर्थिक शिस्तलाच सुट्टी देण्यात आली होती?” असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. महिलांच्या अपेक्षांशी खेळ करणारे हे सरकार असल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, महिलांना स्वावलंबी बनविण्याचे आणि आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या घोषणांमुळे लाखो महिलांनी सरकारवर विश्वास ठेवला. मात्र आता योजना बंद करण्याची किंवा त्यामध्ये कपात करण्याची भाषा केली जात असल्याने महिलांच्या विश्वासाला तडा गेला आहे. “निवडणुकीत महिलांची मते मिळवण्यासाठी योजनांचा वापर करण्यात आला. राजकीय फायदा मिळाल्यानंतर मात्र त्याच महिलांना आर्थिक भाराचे कारण सांगितले जात आहे. हा महिलांच्या भावनांशी आणि विश्वासाशी केलेला विश्वासघात आहे,” असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे म्हटले की, सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली प्रत्येक घोषणा पूर्ण करावी. योजनांमध्ये कपात करण्याऐवजी आर्थिक व्यवस्थापन सुधारण्यावर भर द्यावा. जनतेला आश्वासने देताना आणि जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करताना सरकारला आर्थिक अडचणी जाणवल्या नाहीत, मग आता अचानक राज्यावर आर्थिक भार कसा वाढला, याचे उत्तर सरकारने जनतेला द्यावे. विरोधकांच्या मते, जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. महिलांना दिलेली आश्वासने मागे घेणे किंवा त्यात बदल करणे म्हणजे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्यासारखे आहे. त्यामुळे सरकारने तातडीने आपली भूमिका स्पष्ट करून महिलांसह सर्व लाभार्थ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यातील महिलांच्या विश्वासाचा आदर राखत सरकारने निवडणुकीत दिलेल्या वचनांची पूर्तता करावी, अन्यथा जनतेसमोर सरकारचा खरा चेहरा आणखी स्पष्ट होईल, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.