Top 5 This Week

Related Posts

BREAKING

MAHARASHTRA : पावसाअभावी शेतकरीसंकटात वडेट्टीवारांची मदतीचीमाग

Desk | Maharashtra

राज्यात गेल्या आठ दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन आणि धान पिके गंभीर संकटात सापडली असून, आणखी दोन दिवस पाऊस न झाल्यास अनेक भागांमध्ये दुबार पेरणीची वेळ येऊ शकते, अशी चिंता विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांवरील हे संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले की, यावर्षी एल निनोच्या परिणामामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आधीच हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने सोयाबीन आणि धानाची रोपे करपू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून, परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ते म्हणाले, “जर पुढील दोन दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल. अशा परिस्थितीत बियाणे, खते आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि आवश्यक साहित्य तातडीने उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे.” सरकारवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, “सध्या सरकार जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय वाद आणि सत्तेच्या संघर्षात अधिक व्यस्त दिसत आहे. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर आहेत. त्यांच्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे.” यासंदर्भात काँग्रेस पक्षाने सरकारला पत्र पाठवून तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना मोफत किंवा अनुदानित बियाणे, खते तसेच आर्थिक मदत देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या कृषी पंपांच्या थकबाकी माफीच्या निर्णयाचेही विजय वडेट्टीवार यांनी स्वागत केले.

ते म्हणाले, “ही थकबाकी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. अनेक शेतकऱ्यांनी 20 ते 25 वर्षांपूर्वीच ते पंप वापरणे बंद केले होते. त्यामुळे ही थकबाकी प्रत्यक्षात वसूल होण्याची शक्यता नव्हती. मुख्यमंत्री यांनी घेतलेला निर्णय योग्य असून त्याचा आम्ही स्वागत करतो.” तथापि, केवळ घोषणा करून चालणार नाही, तर त्यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) तातडीने काढून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. महिलांवरील आणि मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “राज्यात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. कायद्याचा धाक उरलेला नाही. दररोज अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले आरटीओ विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार यांनी एसआयटी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. दोषींवर कठोर कारवाई करून भ्रष्टाचारात सहभागी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.