Top 5 This Week

Related Posts

BREAKING

GADCHIROLI : रुग्णवाहिका घोटाळ्यावर विजय वडेट्टीवार आक्रमक.

Desk | Gadchiroli

गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या गंभीर अवस्थेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जिल्ह्यातील अनेक रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी पाठवूनही महिनोन्‌महिने परत न मिळाल्याने दुर्गम भागातील आरोग्य सेवा कोलमडल्याचा आरोप त्यांनी केला. वडेट्टीवार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पाचपैकी काही रुग्णवाहिका सहा महिन्यांपासून तर काही तब्बल दोन वर्षांपासून शोरूममध्ये पडून आहेत. त्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असून रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे दुरुस्तीसाठी पाठवलेल्या रुग्णवाहिकांमधील इंजिन, गिअर बॉक्ससारखे महत्त्वाचे भाग गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून सरकारी मालमत्तेच्या गैरव्यवहाराचे गंभीर उदाहरण असल्याचे वडेट्टीवार यांनी विधानसभेत नमूद केले. तसेच या संदर्भातील माहिती मागणाऱ्या संबंधित अभियंत्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारी यंत्रणेत पारदर्शकता राखण्याऐवजी माहिती दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

गडचिरोली हा दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्हा असल्याने रुग्णवाहिका सेवा ही तेथील नागरिकांसाठी जीवनदायिनी मानली जाते. अशा परिस्थितीत रुग्णवाहिका दीर्घकाळ बंद ठेवणे म्हणजे थेट जनतेच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. विशेषतः गंभीर रुग्ण, अपघातग्रस्त आणि गर्भवती महिलांना याचा मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, रुग्णवाहिकांमधील गायब झालेल्या भागांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी विधानसभेत केली. गडचिरोलीतील आरोग्य सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या मुद्द्यावर सरकार काय भूमिका घेते आणि चौकशीच्या माध्यमातून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे आता गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे