Desk | Buldhana
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे बुलढाणा येथे सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन पाचव्या दिवशीही कायम असून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे तुपकर यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेटी देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आंदोलनस्थळी भेट देत रविकांत तुपकर यांची विचारपूस केली. तुपकर यांची खालावलेली प्रकृती पाहून सानंदा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनामुळे तुपकर यांच्या कुटुंबीयांवरही मोठा मानसिक ताण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले सानंदा यांनी आंदोलनस्थळावरूनच राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे तसेच पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. तुपकर यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती त्यांनी केली. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे आणि शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना सानंदा म्हणाले की, “एखादा व्यक्ती आपल्या
मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करत असेल आणि त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तुपकर यांच्या कुटुंबीयांची अवस्था पाहून कोणालाही वाईट वाटेल. सरकारने त्वरित संवाद साधून हा प्रश्न मार्गी लावावा.” रविकांत तुपकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी, विविध कृषीविषयक प्रश्न सोडवावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू केल्याचे सांगितले जात आहे. आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष बुलढाण्याकडे लागले असून अनेक शेतकरी संघटनांनी तुपकर यांना पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलनस्थळी येणाऱ्या नागरिकांकडूनही तुपकर यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय पथकाकडून नियमित तपासणी केली जात असली तरी उपोषण लांबल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नसली तरी वाढत्या जनसमर्थनामुळे आणि प्रकृती खालावत असल्यामुळे प्रशासनावर दबाव वाढत असल्याचे चित्र आहे. शेतकरी आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचा पुढील टप्पा काय असेल आणि सरकारकडून कोणती प्रतिक्रिया येईल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली असून शेतकरी वर्ग न्यायाच्या अपेक्षेने सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहे
