Top 5 This Week

Related Posts

NAGPUR : रक्तदान हेच खरे जीवनदान विजय वडेट्टीवार यांचे आवाहन.

Desk | Nagpur

रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे… कारण आपल्या एका छोट्याशा प्रयत्नाने एखाद्याला जीवनदान मिळू शकते,” असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त त्यांनी समाजातील सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन करत नागरिकांना स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या संदेशात विजय वडेट्टीवार म्हणाले की, रक्ताची गरज असलेल्या प्रत्येक रुग्णासाठी रक्तदाता हा खऱ्या अर्थाने जीवनदाता असतो. अपघातग्रस्त, गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया करणारे रुग्ण तसेच थॅलेसेमिया आणि कर्करोगासारख्या आजारांनी पीडित असंख्य रुग्णांचे जीवन रक्तदात्यांच्या मदतीमुळे वाचत असते. त्यामुळे रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून मानवतेचे सर्वोच्च उदाहरण आहे. ते पुढे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा रक्ताचा तुटवडा निर्माण होत असतो. अशा वेळी नियमित आणि स्वेच्छेने रक्तदान करणारे नागरिक समाजासाठी देवदूत ठरतात. कोणत्याही जाती, धर्म, पंथ किंवा आर्थिक स्थितीचा विचार न करता एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या जीवासाठी रक्तदान करणे, ही खरी माणुसकी आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक सक्षम नागरिकाने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करण्याचा संकल्प

करावा. विजय वडेट्टीवार यांनी युवकांना विशेष आवाहन करत सांगितले की, देशातील तरुणाईने रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी पुढाकार घ्यावा. महाविद्यालये, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि विविध मंडळांनी नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन करून जनजागृती करावी. रक्तदानाविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती दूर करणे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. “रक्तदानामुळे दात्याच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. उलट नियमित आरोग्य तपासणीची संधी मिळते आणि सामाजिक बांधिलकी जपल्याचे समाधानही लाभते. त्यामुळे भीती आणि संभ्रम बाजूला ठेवून नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे,” असे आवाहन त्यांनी केले. जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने त्यांनी सर्व रक्तदात्यांना मनःपूर्वक सलाम करत त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले. “आपली सेवा, आपली मानवता अनेकांचे जीवन वाचवते. एखाद्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवण्याची ताकद रक्तदानात आहे. म्हणूनच रक्तदान करा आणि जीवनदान द्या,” असा भावनिक संदेश विजय वडेट्टीवार यांनी दिला. समाजात मानवता, सहकार्य आणि परस्पर मदतीची भावना अधिक दृढ करण्यासाठी रक्तदानासारख्या उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या क्षमतेनुसार या पवित्र कार्यात सहभागी होऊन गरजू रुग्णांना नवजीवन देण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.