Top 5 This Week

Related Posts

BREAKING

BULDHANA : 50% बफर स्टॉक तात्काळ रिलीज करण्याची मागणी.

Desk | Buldhana

जिल्ह्यात सध्या डीएपी खताच्या उपलब्धतेवरून शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांची कमतरता जाणवत असल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनावर थेट दबाव वाढवला आहे. अनेक ठिकाणी खत मिळत नसल्याने शेती कामांवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेत वातावरण चांगलेच तापले होते. शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आता कोणतीही विलंब नको, आजच निर्णय घ्यावा लागेल. कलेक्टरची मंजुरी तात्काळ मिळाली पाहिजे, अन्यथा आम्ही इथून हलणार नाही.” या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करावा लागला. चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी, कृषी विकास अधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी संपर्क साधण्यात आला. शेतकऱ्यांच्या मुख्य मागणीमध्ये डीएपी खताचा 50% बफर स्टॉक तात्काळ रिलीज करावा ही प्रमुख मागणी होती. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, हा स्टॉक वेळेत बाजारात उपलब्ध झाला नाही तर खतटंचाई अधिक तीव्र होईल आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. या चर्चेत शेतकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशाराही दिला. जर खत वितरणात दिरंगाई झाली किंवा कोणत्याही

शेतकऱ्याला वाढीव दराने खत विकण्याचा प्रयत्न झाला, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. काही शेतकरी प्रतिनिधींनी तर अत्यंत आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली  दरम्यान, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डीएपी खताचा 50% बफर स्टॉक टप्प्याटप्प्याने रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय उद्यापासून अंमलात आणला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तथापि, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्षात खत वेळेत उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या संपूर्ण जिल्ह्यात या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे आणि कृषी क्षेत्राचे लक्ष लागले आहे. एकंदरीत, खत वितरणाचा प्रश्न लवकर सुटला नाही तर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.