Top 5 This Week

Related Posts

GADCHIROLI : सिरोंच्यात वीज संकट: ५ टॉवर कोसळले

Desk | Gadchiroli

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यावर मुसळधार पावसाने मोठे संकट ओढावले आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आलापल्ली ते सिरोंचा दरम्यानच्या मुख्य वीजवाहिन्यांवर मोठी झाडे कोसळली. या दुर्घटनेत पाच महत्त्वाचे वीज टॉवर जमीनदोस्त झाल्याने सिरोंचा तालुक्यासह ५० पेक्षा अधिक गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. अचानक वीज गायब झाल्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याचा सर्वाधिक फटका शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवांना बसला आहे. सिरोंचा तहसील कार्यालय, पंचायत समिती, विविध सरकारी विभागांची कार्यालये तसेच खासगी आस्थापनांचे कामकाज ठप्प झाले आहे. बँका आणि एटीएम सेवा बंद पडल्याने नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अनेक भागांमध्ये मोबाईल चार्जिंगची समस्या निर्माण झाली असून संपर्क व्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. मात्र, सतत सुरू असलेला पाऊस, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि कोसळलेल्या वीज टॉवरचे मोठे नुकसान यामुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नुकसानग्रस्त वीजवाहिन्या दुरुस्त करून नवीन टॉवर उभारण्यासाठी काही कालावधी लागू शकतो, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. वीजेअभावी पाणीपुरवठा योजना बंद पडल्या असून नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या  भ्यासावर तसेच छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायावरही या परिस्थितीचा विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून तातडीने पर्यायी व्यवस्था उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिरोंचा आणि परिसरातील नागरिक आता वीजपुरवठा कधी सुरळीत होणार, याची प्रतीक्षा करत आहेत.