Desk | Nagpur
नागपूरमध्ये असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत ईमेलवर आलेल्या धमकीच्या संदेशानंतर नागपूर पोलिसांनी तातडीने हालचाल करत उच्च सतर्कता जाहीर केली. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक पथक (BDDS) आणि स्थानिक पोलिसांनी RSS मुख्यालय परिसरात सखोल तपासणी मोहीम राबवली. सुमारे दोन तास चाललेल्या या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक पदार्थ आढळून आले नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्पुरता दिलासा व्यक्त केला असला तरी परिसरातील सुरक्षा व्यवस्था अजूनही कडक ठेवण्यात आली आहे. या धमकीत केवळ नागपूरच नव्हे तर मुंबई आणि पुणे येथील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांनाही लक्ष्य करण्याचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) अधिकृत मेलवर आलेल्या संदेशात पुणे महापौर कार्यालय, विधानभवन तसेच नागपूरमधील RSS मुख्यालय यांसारख्या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला होता.
ईमेलमध्ये विशिष्ट वेळांचा उल्लेख करून विविध ठिकाणी स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली असल्याचेही समोर आले आहे. यामध्ये काही ठिकाणांसाठी दुपारी 1 वाजून 11 मिनिटे आणि 3 वाजून 11 मिनिटे अशा वेळांचा उल्लेख असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. तसेच 10 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान काही विशिष्ट वेळेत हल्ल्याची शक्यता असल्याचा दावा देखील ईमेलमध्ये करण्यात आला होता. धमकी मिळताच नागपूर पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. RSS मुख्यालयासोबतच हरिहर मंदिर आणि स्मृती भवन परिसरातही खबरदारी म्हणून तपासणी करण्यात आली. नागपूर झोन-3 चे डीसीपी राहुल मदने यांनी सांगितले की, हा प्रकार गांभीर्याने घेतला असून सायबर तज्ज्ञांच्या मदतीने ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की प्राथमिक तपासणीत कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळलेली नाही, मात्र खबरदारी म्हणून परिसरात सतत गस्त आणि सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली आहे. सायबर सेल आता या धमकी ईमेलचा स्रोत शोधण्यासाठी तांत्रिक तपास करत आहे. या घटनेमुळे नागपूरसह पुणे आणि मुंबईतील प्रशासकीय यंत्रणा काही काळ अलर्ट मोडवर आल्या असून पुढील तपास सुरू आहे
