Top 5 This Week

Related Posts

PUNE : पुणे महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी

Desk | Pune

शहरात बुधवारी मोठी खळबळ उडाली, जेव्हा पुणे महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली. या धमकीमुळे काही काळासाठी महापालिका परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षा यंत्रणा तातडीने अलर्ट मोडवर गेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर सकाळी सुमारे ८ वाजून २१ मिनिटांनी धमकीचा ईमेल प्राप्त झाला. या ईमेलमध्ये पुणे महानगरपालिकेतील महापौर कार्यालयासह पुण्यातील मोदीबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय, नागपूर येथील RSS चे मुख्यालय आणि पुणे विधान भवन उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या ईमेलमध्ये १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारचा उल्लेख करण्यात आला आहे. ऑपरेशन ब्लू स्टारच्या पार्श्वभूमीवर बदला घेण्याच्या उद्देशाने ही धमकी दिल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणाचा तपास त्या दृष्टीनेही केला जात आहे. धमकीचा ईमेल प्राप्त होताच पुणे पोलिसांनी कोणतीही जोखीम न पत्करता तातडीने सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या.

बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), श्वान पथक, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस मोठ्या संख्येने महापालिका मुख्यालयात दाखल झाले. संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आणि सर्व कर्मचारी व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. महापालिका परिसरात जवळपास दीड ते दोन तास सखोल तपासणी करण्यात आली. प्रत्येक मजला, कार्यालय, पार्किंग परिसर आणि संशयास्पद ठिकाणांची तपासणी करण्यात आली. श्वान पथकाच्या मदतीने परिसराची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने काही तासांनंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात प्रवेश देण्यात आला. या घटनेदरम्यान महापालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. “आम्हाला अचानक बाहेर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. बॉम्बसंदर्भात ईमेल आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण होते,” अशी प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. काहींनी तर दिवसभर भीतीचे वातावरण कायम राहिल्याचे सांगितले. दरम्यान, धमकीच्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर ठिकाणांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. पुण्यातील RSS कार्यालय, नागपूर येथील संघ मुख्यालय आणि संबंधित शासकीय इमारतींवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संबंधित परिसरांमध्ये तपासणी मोहीम राबवण्यात येत असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता सायबर पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाच्या मदतीने करण्यात येत आहे. धमकीचा ईमेल नेमका कुठून पाठवण्यात आला, त्यामागे कोणाचा हात आहे आणि ही केवळ खोडसाळपणा आहे की गंभीर कटाचा भाग आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुणे हरासह राज्यातील सुरक्षा यंत्रणांची सतर्कता वाढली असून, संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.